तुळजापूर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) धाराशिवच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर शहरात 'नगर संकीर्तन' सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. "कलियुगी नाम संकीर्तन, हेचि मुख्य साधन" या सिद्धांतानुसार, जीवाच्या कल्याणासाठी आणि हरिनामाचा प्रचार करण्याच्या पवित्र हेतूने ही श्रीराम फेरी काढण्यात आली.
इच्छापूर्ती गणेश मंदिरापासून सुरू झालेली ही अमृतमयी श्रीराम फेरी अयोध्या नगरातून मार्गक्रमण करत महावीर कासार प्रभूजींच्या निवासस्थानी पोहोचली. यावेळी भक्तवृंदांनी श्रील प्रभुपादांच्या शिकवणुकीनुसार संकीर्तनाचा आनंद घेतला. वाढत्या तापमानाची तमा न बाळगता भक्तांनी हरिनामात तल्लीन होऊन नृत्य केले. सर्व भाविकांना श्री महावीर कासार प्रभूजी यांनी 'कृष्णप्रसादाचे' वितरण केले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी होणाऱ्या या आध्यात्मिक उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन इस्कॉन भक्तांनी केले.
