तुळजापूर प्रतिनिधी
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुलदीप उर्फ धीरज पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
तुळजापूर मतदारसंघातून ते अर्ज दाखल करणार असून अर्ज दाखल करण्याआधी जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. यावेळी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून नामांकन रॅली काढण्यात येणार आहे.
नामांकन अर्ज भरल्यानंतर पुजारी मंगल कार्यालय येथे सभा पर पडणार असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी सर्व सहकारी बंधू भगिनींनी मायबाप मतदार युवक मित्रांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.