आरळी बुद्रुक येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

mhcitynews
0



शिवजयंती निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तुळजापूर  प्रतिनिधी 

तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमी व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे या स्पर्धेत सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ४८ ग्रामीण क्रिकेट संघांचा सहभाग नोंदविण्यात आला आहे.

मंगरूळ जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या सीमा भैरवनाथ माडजे (रोचकरी), आरळी पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य कृष्णा देवानंद रोचकरी, युवा उद्योजक गणेश पुजारी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. 

शिवजयंतीच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. 

विविध गावांतील क्रिकेट संघांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, प्रत्येक संघ विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. मैदानावर रंगतदार सामने होत असून प्रेक्षकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

उद्घाटन प्रसंगी जेष्ठ क्रीडा प्रशिक्षक इसाक पटेल, लोहारा तालीम संघाचे अध्यक्ष दयानंद साळुंखे, पैलवान मसूद शेख बादोला, भैरवनाथ मांडजे, युवा उद्योजक महेश गवळी, बाबासाहेब भोसले, महेश कचरे, लक्ष्मण कचरे, नागेश सरडकर, आयोजक संजय पारवे, बाजीराव जाधव, सचिन उकरंडे, निवृत्ती कोळी, कालिदास पारवे आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील युवकांना क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरत असून, शिवजयंतीसारख्या प्रेरणादायी दिवसाच्या निमित्ताने खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण होत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. ही स्पर्धा पुढील काही दिवस सुरू राहणार असून विजेत्या संघासाठी आकर्षक पारितोषिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top