धाराशिव प्रतिनिधी
आम आदमी पार्टीच्या उपजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत मधुकर शेळके यांनी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलासभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र राष्ट्रीय संमेलनात आपला प्रवेश जाहीर केला.
महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मुंबई येथे 27 मार्च 2025 रोजी झालेल्या या भव्य संमेलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या शुभहस्ते मधुकर शेळके यांनी काँग्रेसशी नवे नाते जोडले. इंटक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय कुमार सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस गोविंदराव मोहिते, प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, सोलापूर जिल्हाध्यक्ष रामधन जमाले अहिल्यादेवी नगर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र कडिले, रेखाताई हजारे सह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मधुकर शेळके यांच्या पक्षांतरामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रवेशामुळे काँग्रेसच्या इंटक संघटनेला अधिक बळ मिळणार असून, आगामी काळात श्रमिक वर्गातील नेतृत्व अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.