४ विधानसभा मतदारसंघात १२ नामांकन अर्ज दाखल ; ४९ व्यक्तींनी केली ८३ अर्जाची खरेदी
धाराशिव प्रतिनिधी ( सिद्दीक पटेल )
जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात आज २४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी ६ उमेदवारांनी १२ नामांकन अर्ज दाखल केले. तर ४९ अर्जदारांनी ८३ अर्ज खरेदी केले.
यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एक अर्ज भारतीय जनता पार्टी व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून नामनिर्देशन दाखल केले.
मागील ५ वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण जनकल्याणाच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा तुळजापूर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता व संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या आशीर्वादाने, मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या साथीने यंदाही विजय आपलाच होईल असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केले.
तर २४० उमरगा विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.तर १० अर्जदारांनी १९ नामांकन अर्जाची खरेदी केली.२४१ - तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ३ उमेदवारांनी ५ अर्ज दाखल केले. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एक अर्ज,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दोन अर्ज आणि बहूजन समाज पार्टीच्या वतीने श्री.तांबोळी यांनी एक अर्ज दाखल केला तर ९ इच्छुक उमेदवारांनी २१ अर्ज खरेदी केले.
तसेच २४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीच्या वतीने सुभाष गायकवाड यांनी नामांकन अर्ज दाखल केला.तर २० अर्जदारांनी २६ अर्ज खरेदी केले आणि २४३ -परंडा विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत शिवसेना (शिंदे गट) यांनी दोन अर्ज दाखल केले.अपक्ष योगीराज तांबे आणि नाना मदने यांनी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल केले. १० व्यक्तींनी १७ अर्ज आज खरेदी केले.
