तुळजापूर प्रतिनिधी
कलियुगात हरिनाम हेच मनुष्य जीवनासाठी अंतिम सत्य असून याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन श्रीमान प्रजापती विष्णुदास इस्कॉन धाराशिव यांनी केले. मनुष्य जन्माचा उद्देशच भगवंताचे स्मरण हा आहे. त्यासाठी मृत्युच्या वेळी भगवंतांचे स्मरण झालं पाहिजे आणि त्यासाठी आयुष्यभर सतत नामस्मरणाचा सराव केला पाहिजे, तरच मरते वेळी भगवंताचं स्मरण होणे शक्य आहे. जो व्यक्ती सतत कृष्ण कथा श्रवण करेल व सतत नामस्मरण करेल त्याला भगवंत प्रेम प्राप्त होऊन शेवटी त्याला भगवंत प्राप्ती होईल असे प्रभूजी म्हणाले. प्रभूजींनी सुदामा चरित्र सांगितले. मैत्री कशी असावी ? कोणासोबत मैत्री करावी ? हे सुदामा चरित्रावरून आपण शिकू शकतो. मित्रांमध्ये गरीब श्रीमंत असा भेद नसतो मित्र हा व्यसनी नसावा, व्यसन शिकवणारा नसावा तर मित्र हा वैष्णव, सत्संग करणारा असावा असे प्रभूजी म्हणाले.
सध्याचे कलियुग फार विचित्र असून कलियुगात अराजकता खूप वाढली आहे. कलियुगात नामस्मरण न करणे, भगवंत चिंतन न करणे, पांडूरंगाला नमन न करणे अशा प्रवृत्ती खूप वाढल्या आहेत. अशा प्रवृत्तींच्या लोकांना नेण्यासाठी अंतिम वेळी यमदुत येतात व त्यांना नरक प्राप्ती होते, असेही मत प्रजापती विष्णुदास यांनी मांडले. भागवत कथेच्या आजच्या समापन दिवशी 250 ते 300 भाविक हजर होते. कथेनंतर संकीर्तन झाले, हरे कृष्णाच्या महामंत्रात सर्वजण तल्लीन झाले होते.