तुळजापूर | सिद्दीक पटेल
मंगरूळ जिल्हा परिषद गटातील उमेदवारीवरून सुरू असलेली चर्चा ही केवळ अंतर्गत राजकारणापुरती मर्यादित न राहता आता थेट मतदारांच्या मानसिकतेवर परिणाम करणारी ठरत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यास मतदारसंघात ‘धक्कादायक’ राजकीय बदल घडू शकतो, असा स्पष्ट इशारा मतदारांकडून दिला जात असून, याकडे पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटन उभारणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी न देता बाहेरून आलेल्या किंवा वारंवार भूमिका बदलणाऱ्या नेत्यांना प्राधान्य दिल्यास पक्षाची मुळं कमकुवत होण्याची शक्यता आहे. मतदारांच्या मते, निवडणूक ही केवळ व्यक्तीवर नव्हे तर निष्ठा, विश्वास आणि सातत्य या मूल्यांवर लढली पाहिजे. अशी अपेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून येत आहेत
मोठी पदे भूषवलेले काही नेते स्वार्थासाठी पक्ष बदलत असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे. अशा संधीसाधू राजकारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा तर मतदारांमध्ये संशय निर्माण होत आहे. “निवडणूक जिंकण्यासाठी काहीही चालते” ही मानसिकता मतदारांनी नाकारली असून, याचा फटका संबंधित पक्षाला बसू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
ही बदलती भूमिका राजकीय गरज आहे की वैयक्तिक स्वार्थ, यावर उघड चर्चा सुरू झाली असून, मतदार आता ‘कोण काय म्हणतो’ यापेक्षा ‘कोण सातत्याने काय करतो’ याकडे अधिक लक्ष देत आहेत. येत्या निवडणुकीत महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा कल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः युवक वर्गात पारंपरिक नेत्यांबद्दल नाराजी असून, प्रामाणिक व संघर्षशील नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका घेतली जात आहे. महिला वर्गातही “काम करणाऱ्यालाच संधी” ही भावना बळावत असून, हे समीकरण बदलणारे ठरू शकते.
एकीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देऊन संघटन मजबूत करणे, तर दुसरीकडे संधीसाधू राजकारणाला खतपाणी घालून संभाव्य बंडखोरी व मतभंगाला आमंत्रण देणे. असे दोन पर्याय सध्या पक्ष नेतृत्वासमोर स्पष्ट पर्याय असल्याचे जन मानसातून बोलताना दिसून येत आहे.
जर निष्ठेला न्याय मिळाला नाही, तर यावेळी मंगरूळ जिल्हा परिषद गटात पारंपरिक मतदान पद्धती मोडीत निघून अनपेक्षित निकाललागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. ही निवडणूक पक्षासाठी शक्तिपरीक्षा ठरणार असून, मतदारांचा रोष की विश्वास – याचा निर्णय मतपेटीतून होणार आहे.