हितगुज करुया मिळून साऱ्याजणी,हळदी कुंकू लावूया अंगणी
तुळजापूर प्रतिनिधी
वरील ओळींमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रमाचे सौंदर्य आणि त्यामागचा सामाजिक उद्देश अगदी सुंदरपणे व्यक्त होतो. महिलांची एकत्रता, आपुलकी आणि आनंदाचा उत्सव यांचा सुगंध या कार्यक्रमात दरवळतो. एकत्र येऊन संवाद साधणे, मनमोकळ्या गप्पा मारणे, परंपरेची जपणूक करणे आणि परस्परांना शुभेच्छा देणे हेच या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. अंगणात मांडलेल्या रांगोळ्या, पारंपरिक पोशाख, हलव्याचे दाणे आणि वाण यामुळे वातावरण अधिक मंगलमय होते.
हळदी-कुंकू कार्यक्रम हा महिलांसाठी आयोजित केला जाणारा पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जो प्रामुख्याने मकर संक्रांतीपासून सुरू होतो. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना एकत्र आणणे, सामाजिक एकोपा वाढवणे आणि परस्पर शुभेच्छा देणे हा असतो. याचेच औचित्य साधून शहरातील पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश विश्वनाथ पुजारी यांच्या परिवारातर्फे आयोजित मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमास शहरातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे पार पडला.
यावेळी महादेवी लिंबाजी पुजारी, सानिका नागनाथ पुजारी, प्रमिला तानाजी पुजारी, दीपाली सोमनाथ पुजारी, स्नेहा मोरे, नीता पुजारी, संगीता पुजारी, अश्विनी मोटे, डॉ.प्रिया राजेश पाटील, सुमन पुजारी, अनिता अमृतराव, गायत्री अमृतराव, मनीषा छत्रे, जयश्री छत्रे, दीपाली जाधव, अरुणा पुजारी, तुळसा पुजारी, अश्विनी धनके, नंदिनी कोळगे आदी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या समारंभामध्ये पुजारीनगर सोसायटीतील महिला भगिनी यांना शुभांगी पुजारी व सुनंदा पुजारी यांच्याहस्ते तिळगुळ वाण, पारंपरिक भेटवस्तू वाटप करत हळदी कुंकू कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
