धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेची अनेक कामे गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाली आहेत. या कामांना तातडीने गती द्यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांनी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री मा.ना. भरत शेठ गोगावले यांच्याकडे केली. यासंदर्भात मंत्री महोदयांची भेट घेऊन अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
दिं. 10 डिसेंबर 2024 रोजी MGNREGA कमिशनर श्री. रविंद्र ठाकरे यांनी आदेश काढून जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेची कामे थांबवली होती. परिणामी, 700 ते 800 प्रलंबित कामे आजही सुरू झालेली नाहीत. यामुळे शेतकरी आणि मजूरवर्ग संकटात सापडला आहे.
पावसाळ्यापूर्वी कामे सुरू न झाल्यास मोठा फटका
या कामांत शेतरस्ते महत्त्वाचे असून, ते पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतीत जाणे कठीण होईल. तसेच, पिकांची वाहतूक करताना मोठ्या अडचणी निर्माण होतील. त्यामुळे रोजगार हमी योजनेतील शेतरस्त्यांची कामे त्वरित सुरू करावीत, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच या प्रलंबित कामांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.
