तुळजापूर प्रतिनिधी
कलियुगातील गणेशोत्सवात बप्पाला आवडेल तेच करावे, आपल्या आवडीची सक्ती गणेशोत्सवात करू नये असे आवाहन प्रजापती विष्णुदास - इस्कॉन धाराशिव यांनी केले.
लोकमान्य युवा मंच, अयोध्या नगर आयोजित प्रवचनात प्रभुजी बोलत होते. सत्ययुग, त्रेतायुग व द्वापार युगात श्रुती स्मृती गुरुकुल पद्धत होती. त्यावेळी फक्त ऐकून व लक्षात ठेवून अध्ययन होत होते. पुढे कलियुगात ही अध्ययन पद्धत नाहीशी झाली. कलियुगातील लोक अल्पायुषी, मंदबुद्धी व चिंतांनी विचलित असल्याने त्यांची श्रुती-स्मृती हळूहळू नष्ट झाली. सध्या लिखाण पद्धत अस्तित्वात राहिली. सर्व शास्त्रे, पुराने व्यास ऋषींनी सांगितली व गणपती बप्पांनी ती लिहून काढली. हा शास्त्रांचा अनमोल ठेवा आज आपल्याला गणपती बप्पांमुळे मिळत आहे. बुद्धीची देवता गणेशजी असल्याने जो कोणी शास्त्र अध्ययन करतो त्यास अध्यात्मिक विवेक बुद्धी देण्याचे काम गणपती बप्पा करतात, असे प्रभुजी म्हणाले.
सध्या गणेशोत्सवामध्ये हिंदी गाणे, डीजेचा वापर, वेडा वाकडा डान्स सर्रास पहावयास मिळतो. हे प्रकार बप्पांना आवडतात का? याचा कोणी विचार करत नाही तेव्हा गणपती बप्पांना आवडणारे हरिनाम संकीर्तन, भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन प्रभुजींनी केले. प्रवचनासाठी 250 ते 300 भाविक भक्त उस्फूर्तपणे हजर होते.
