तुळजापूर प्रतिनिधी
पर्यावरण रक्षणाच्या घोषणा केवळ भाषणांपुरत्याच मर्यादित राहिल्या असताना, तुळजापूर शहरात संकल्प प्रतिष्ठान व धैर्यशील दरेकर मित्रपरिवार यांच्या वतीने “एक कुटुंब – एक वृक्ष” हा उपक्रम प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक परिवर्तन घडवत आहे. घर तेथे वृक्ष या संकल्पनेमुळे नागरिक थेट पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात सहभागी होत आहेत.
एका छोट्या उपक्रमातून झालेली सुरुवात ते आजपर्यंत तुळजापूर शहरात १,००० पेक्षा अधिक वृक्षांचे वाटप करण्यात आले आहे. राजकीय पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी न मिरवता, वाढदिवस व सामाजिक कार्यक्रम वृक्षारोपणाच्या माध्यमातून साजरे करण्याचा नवा सामाजिक संकेत या उपक्रमाने निर्माण केला आहे.
विशेष म्हणजे, मकर संक्रांतीसारख्या पारंपरिक सणालाही पर्यावरणाचा आशय देत वृक्षमित्र सौ. संध्या धैर्यशील दरेकर यांनी हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना फुले, फळांची रोपे व वृक्ष लागवडीसाठी कुंड्या भेट दिल्या. सण-संस्कृती आणि पर्यावरण यांचा संगम साधणारा हा उपक्रम महिलांमध्ये जागृती निर्माण करणारा ठरला असून, परिसरात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी सौ. अनिता सज्जनराव साळुंके, नगरसेविका श्वेता वैभव साळुंखे निशा अवताडे प्रतीक्षा क्षीरसागर नेहा क्षीरसागर,शितल चोपदार शिवानी भालेकर रश्मी भालेकर सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात वाढती काँक्रीटकरण, वृक्षतोड आणि प्रशासनाची ढिसाळ भूमिका यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, हा उपक्रम सामाजिक संदेश देत आहे. पर्यावरणासाठी कायदे कागदावर असताना, जनतेतून उभा राहिलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे रूप घेत आहे.
संकल्प प्रतिष्ठान व दरेकर परिवार यांच्या या प्रयत्नांना तुळजापूरकरांचा वाढता पाठिंबा मिळत असून, पर्यावरण रक्षण ही जबाबदारी सरकारपेक्षा आधी जनतेची आहे, हा स्पष्ट राजकीय–सामाजिक संदेश या उपक्रमातून पुढे येत वृक्ष वाटपासाठी सामाजिक वनीकरण विभाग तुळजापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
