शिवगणेश सांस्कृतिक मंडळाचा समाजप्रबोधनाचा उत्सव, गोंधळ कलेला मानाचा मुजरा
तुळजापूर प्रतिनिधी
परंपरा आम्ही जपतो, मोरयाचा गजर आम्ही करतो हे ब्रीदवाक्य घेऊन यंदाचा गणेशोत्सव समाजप्रबोधनाची जोड देत साजरा करणाऱ्या श्रीक्षेत्र तुळजापूर येथील घाटशिळचा राजा, शिवगणेश सांस्कृतिक गणेश मंडळ, घाटशिळ रोड यांच्या वतीने भक्तिमय गोंधळ तुळजाभवानीचा - गोंधळी तुळजापूरचा या भक्तिगीत गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तुळजापूरचे सुप्रसिद्ध गोंधळी सम्राट कै. राजेंद्रभाऊ गायकवाड यांच्या गोंधळ कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे गोंधळी विजय चंद्रकांत मोरे आणि त्यांची टीम यांनी महाराष्ट्रासह देशभर या लोप पावत चाललेल्या कलेचा प्रचार-प्रसार चालवला आहे.
यावेळी गोंधळ सम्राट कै. राजेंद्रभाऊ गायकवाड कला समूहाचे प्रमुख विजय मोरे यांच्यासह सहकलाकार प्रकाश ननवरे, लक्ष्मण देडे, अजय राखेलकर, सुरेश विभुते, गणेश भिसे, अंबादास घोटकर, दगडू पवार, तात्या डोलारे, संतोष डोलारे, अमोल गुरव यांनी गणपती बाप्पा, आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ओजस्वी गीतांचे सादरीकरण करत उपस्थित गणेश भक्त आणि देवी भक्तांची मने जिंकली. गोंधळाच्या तालावर अवघा परिसर भक्तिमय झाला होता. भक्तांनी या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमानंतर शिवगणेश मंडळाच्या वतीने सर्व कलाकारांचा बोधचिन्ह आणि सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
केवळ गोंधळच नाही, तर संपूर्ण गणेशोत्सव काळात मंडळाने रक्तदान शिबिर, चारोळी कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, स्थानिक कलाकारांसाठी डान्स कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, 'लावणी म्हणते या रावजी' कार्यक्रम, अन्नदान महाप्रसाद, महिलांच्या हस्ते महाआरती, मोदक स्पर्धा, संगीत खुर्ची असे विविध समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले आहेत. सामाजिक जाणिवेतून साजरा होत असलेल्या या उत्सवाचे तुळजापूरकरांमधून विशेष कौतुक होत आहे.
