तीन तोळे सोन्याचे दागिने काढून घेतल्याची फिर्याद; सुरतगावातील पाच जणांविरुद्ध गुन्हा
तुळजापूर प्रतिनिधी
शेताच्या बांधावरील काटेरी झुडपे काढण्याच्या कारणावरून सुरतगाव शिवारात वाद होऊन मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी कोयता, लोखंडी हत्यार आणि काठीने मारहाण करून जखमी केल्याचा, तसेच सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात सुरतगावातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश शिवाजी गुंड (वय ४०, रा. सुरतगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव, सध्या रा. चनोद, वापी, जि. वलसाड, गुजरात) यांच्या भावाकडून १२ सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास सुरतगाव शिवारातील गट क्रमांक ३१९ मध्ये शेताच्या बांधावरील काटेरी झुडपे काढण्यात येत होती.
यावेळी नागेश दत्ता नकाते, अनिकेत अनिल नकाते, दत्तात्रय महादेव नकाते, विजय भैरवनाथ नकाते व समर्थ सुनिल नकाते (सर्व रा. सुरतगाव) यांनी एकत्र येऊन शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दिनेश गुंड यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच कोयता, लोखंडी हत्यार व काठीने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. या झटापटीत त्यांच्या अंगावरील सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने काढून घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी दिनेश गुंड यांनी २६ सप्टेंबर रोजी तामलवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११९(१), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३) व १९० अन्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास तामलवाडी पोलिस करीत आहेत.
