नवरात्रोत्सवावरील खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा जनहित संघटनेची तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे मागणी

mhcitynews
0



तुळजापूर प्रतिनिधी 

धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळाच्या सावटाखाली असून, हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ अंतर्गत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्च टाळून दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जनहित संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अजय (भैय्या) साळुंके यांनी केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भक्तांकडून श्रद्धेपोटी मंदिरात अर्पण करण्यात येणाऱ्या पैशांचा वापर केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांवरील उधळपट्टीसाठी न करता सध्या अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी करावा. धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळाच्या सावटाखाली असून, यंदा हंगामातील सर्व पिके वाया गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ हा सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा न करता मंदिर संस्थानच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. त्यामुळे मंदिर संस्थान आणि शेतकरी यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकरी आर्थिक संकटात असताना मंदिर संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनहित संघटनेने केली आहे यावेळी प्रशांत सोंजी उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top