उमरगा प्रतिनिधी
चिंचोली भुयार शिवारातील शेतात एका ३८ वर्षीय व्यक्तीची फरशी व दगडाने मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तानाजी शिवाजी गायकवाड (वय ३८, रा. चिंचोली भुयार, ता. उमरगा, जि. धाराशिव) हे चिंचोली भुयार शिवारातील सर्व्हे नं. ३९ मधील शेतात असताना निशांत अंकुश पांढरे व आशिष आण्णाराव गुरुळे (दोघे रा. काटेवाडी, ता. उमरगा) यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
ही घटना दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मयताची पत्नी आणि आरोपी निशांत पांढरे यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपींनी तानाजी गायकवाड यांना फरशी व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी मयताची आई सोजरबाई शिवाजी गायकवाड (वय ७५, रा. चिंचोली भुयार) यांनी दि. ३० सप्टेंबर रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीच्या आधारे मुरुम पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०३(१) (खून) व ३(५) (सामायिक हेतूने केलेले कृत्य) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुरुम पोलीस करीत आहेत. हत्येमागील नेमका घटनाक्रम, आरोपींची भूमिका आणि इतर संबंधित बाबींचा तपास सुरू आहे.
