शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा ११ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीची पाहणी केली. नवरात्रोत्सवाच्या काळात राज्यभरातून तसेच परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत असल्याने भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे, तसेच वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला.


जिल्हाधिकारी पुजार यांनी घाटशिळ पार्किंग, हडको मैदान पार्किंग, अग्निशामक पार्किंग तसेच धाराशिव रोड, लातूर रोड आणि नळदुर्ग रोड येथील पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. या ठिकाणी उपलब्ध जागा, वाहनांची क्षमता, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहतूक नियंत्रण तसेच भाविकांच्या वाहनांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.


नवरात्रोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने, एसटी बसेस तसेच इतर वाहनांची शहरात ये-जा होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पार्किंगच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सोईसाठी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.


यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी बिडकर पायऱ्या मार्गे असणाऱ्या दर्शन मार्गाची तसेच श्री तुळजाभवानी मंदिर व मंदिर परिसरातील विविध व्यवस्थांची पाहणी केली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांगा, प्रवेश व निर्गमन मार्ग, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक सोयी-सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. गर्दीच्या काळात भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी विभागांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


त्यानंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, वीज व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा तसेच भाविकांच्या सोयी-सुविधांबाबत करण्यात आलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


नवरात्रोत्सवाच्या काळात वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात, सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी पुजार यांनी दिल्या. तसेच भाविकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


यावेळी पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले, आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद साठे, सा. बां. उपअभियंता विजय आवळे, वैद्यकीय अधिकारी अविनाश ढगे, डॉ. परमेश्वर फड, टी. व्हि. क्षीरसागर, परिवहन अधिकारी महेश रामपूरे, महावितरण अभियंता नंदकुमार काळे, अन्न सुरक्षा अधिकारी पी. डी. इंबडे, तालुका क्रीडा अधिकारी, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top