टिळक भवन येथे वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
धाराशिव प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सख्खे साडू ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबई येथील टिळक भवन येथे १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
ॲड. रविंद्र नागरगोजे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्याशी असलेले त्यांचे कौटुंबिक नाते या पक्षप्रवेशामुळे पुन्हा चर्चेत आले आहे.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, रेहाना चिस्ती, भानुदास माळी, श्रीनिवास बिक्कड, धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, ओबीसी प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार, प्रदेश सरचिटणीस मलंग शेख यांच्यासह काँग्रेसचे विविध नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ॲड. रविंद्र नागरगोजे यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नागरगोजे यांच्या पक्षप्रवेशाची धाराशिव जिल्ह्यात राजकीय चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या स्थानिक संघटनात्मक राजकारणाला कोणते स्वरूप मिळते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेकडे तसेच आगामी काळातील त्यांच्या सक्रियतेकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
