तुळजापूर -सिद्दीक पटेल
उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईसह पशुधनासाठी चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती तसेच CSR कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती अॅड. आकांक्षा ज्योती ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत असून उपलब्ध जलस्रोतांवरील ताण वाढत आहे. पशुधनाच्या संगोपनासह ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ तात्पुरता पाणीपुरवठा न करता भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे अॅड. चौगुले यांनी म्हटले आहे.
गरजू गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच विहिरींचे पुनर्भरण, बोअरवेल व विहिरी परिसरात रिचार्ज स्ट्रक्चर उभारणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी आवश्यक कामे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यासोबतच नाला खोलीकरण, रुंदीकरण व पुनरुज्जीवन, गाळ काढणे, छोटे जलसंधारण बंधारे आणि पाणलोट क्षेत्र विकासया कामांनाही प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुष्काळाचा फटका पशुधनालाही बसत असल्याने चारा छावण्या, चारा उपलब्धता, पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था आणि पशुपालक कुटुंबांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी संस्था व CSR कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गरजू गावांची निवड करून प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ‘व्हिलेज वॉटर सिक्युरिटी प्लॅन’ तयार करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. उपलब्ध पाणी, भूजल, जलस्रोत, पाणलोट क्षेत्र आणि भविष्यातील पाण्याची गरज यांचा अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यावर भर देता येईल.
पाणीटंचाईचा सर्वाधिक परिणाम महिला व ग्रामीण कुटुंबांवर होत असल्याने महिला बचत गट, ग्रामसंघ आणि स्थानिक समुदायांच्या सहभागातून जलसुरक्षा व उपजीविका संरक्षणाचे कार्यक्रम राबविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
CSR निधी, सामाजिक संस्थांचे योगदान, दानशूर संस्थांचे सहकार्य आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग यांचा समन्वय साधून उमरगा तालुक्यातील गरजू गावांमध्ये प्रत्यक्ष कामे उभी करावीत, असे आवाहन अॅड. आकांक्षा चौगुले यांनी केले आहे.
