तुळजापूर प्रतिनिधी
शाकंभरी नवरात्रानिमित्त मंगळवारी सकाळी सुवासिनी व कुमारीका यांची जलकलशयात्रा मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने जल्लोषात पार पडली. या यात्रेत मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी हजेरी लावून दर्शन घेतले. यावेळी उपस्थित पुजारी ,उपाध्ये व सेवेकरांनी आई राजा उदे उदे, शाकंभरी माता की जय असा जयघोष करून संपूर्ण छत्रपती शिवाजी चौक दणाणून सोडला.
पौष द्वितीया मंगळवार अर्थात शाकंभरी नवरात्रातील पाचवी माळ यानिमित्त महिलांची जलकलश यात्रा काढण्यातआली होती.प्रारंभी शाकंभरी यजमान राम प्रभाकर कुलकर्णी दाम्पत्याने पापणास तीर्थ येथील इंद्रायणी देवीस अभिषेक घालून तीर्थातील् जलाचे पूजन केले. यानंतर मुख्यजल कुंभासह नऊ जलकलशाचे पूजन करून श्रीच्या प्रतिमा पूजन व सप्तरथातील प्रतिमेचे पूजन केले . जलकलशयात्रेचा प्रारंभ बैलगाड्या व दोन आश्ववर भगवा पताका घेऊन करण्यात आला. यात तुतारीवाले ,बँडवाले, हलगीवाले, सनईवादक, ताशावाले ,गोंधळी, वारू वाले ,धनगरी पथक, आराधी ,इत्यादीजण सहभागी झाली होते. या यात्रेत हत्ती व हडपसर येथील बँडपथक हे आकर्षण ठरले होते .जलयात्रा छत्रपती शिवाजी चौकात येताच जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे विश्वस्त तहसीलदार सौदागर तांदळे ,व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांनी रथातील देवी प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले व विविध सहभागी कलावंतासमावेश फोटो सेशन केले. यानंतर जलयात्रा आंबेडकर चौक ,दीपक चौक, सुवर्णेश्वर गणपती यामार्गे महाद्वारातून मंदिरात आली. जलयात्रा तुळजाभवानी मंदिरात येताच देवी गाभाऱ्यात महिलांनी आणलेले जलकलशातील जल देवी चरणी अर्पण करण्यात आले. यानंतर सर्व महिलांची खण नारळाने ओटी भरण्यात आली. जलयात्राची सांगता होताच प्रक्षाळ मंडळाच्यावतीने जलयात्रेतील सहभागी व देवी भाविकांना प्रसादरूपी भोजन देण्यात आले.
या जलकलयात्रेत देवीचे सर्व महंत, शाकंभरी यजमान राम कुलकर्णी दांपत्य व त्यांचा परिवार, व्यवस्थापक योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, लेखाअधिकारी सिद्धेश्वर शिंदे, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, मंदिर अधिकारी व कर्मचारी, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो,मकरंद प्रयाग, भोपे मंडळाचे सुधीर कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे बिपिन शिंदे, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी सर्व पदाधिकारी व सदस्य शहरातील पुजारी वर्ग सेवेकरी आराधी उपाध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ही जलकलशयात्रा म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारी जलयात्रा ठरली.

.jpg)