तुळजापुर प्रतिनिधी
सध्या एच थ्री एन टुची रुग्णसंख्या वाढत असल्याने व तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने शहरवासी व पुजारी वर्गानी या संसर्गरोगाची काळजी घ्यावी व आपणास याचा संसर्ग होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर जाधव यांनी केले आहे. कोरोनानंतर एच थ्री एन टु या संसर्ग रोगाची मोठी वाढ होत आहे. या संसर्ग रोगाची प्राथमिक लक्षणे ताप खोकला व सर्दी असे आहेत. ताप -सर्दी तीन दिवसापेक्षा अधिक असेल तर संबंधितानी तात्काळ रुग्णालयात जाऊन यावर उपचार घ्यावे. शक्यतो हा आजार प्राथमिक अवस्थेत कसा दुरुस्त होईल याची नागरिकांनी काळजी घ्यावी. हा संसर्गरोग आपणास होऊ नये यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे जर जाणे आवश्यक असेल तर तोंडानाकावर मास्कचा वापर करावा. सद्यस्थितीत यावर मास्क हाच उपाय आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र असल्याने देवी दर्शनासाठी राज्यसह कर्नाटक आंध्र तेलंगणा या राज्यातील देखील भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. सध्या कर्नाटकात या संसर्ग रोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. यासाठी तुळजापूरवासीयांनी योग्य ती खबरदारी घेऊन या संसर्ग रोगापासून दूर राहण्यासाठी मास्कचा वापर करावा असे आवाहन डॉ. श्रीधर जाधव यांनी केले आहे.
