आज जागतिक ग्राहक दिन, ग्राहक म्हणून हे आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या

mhcitynews
0

 


संपूर्ण जगात १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो, (Customer is king of Market) असं म्हटलं जातं. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी उद्युक्त करण्यासाठी विक्रेत्यांकडून अनेक प्रयत्न केले जातात, अनेक आमिषे दाखवली जातात. अनेकदा यातून फसवणूकीचे प्रकार घडल्याची उदाहरणेही नवीन नाहीत. पण एक ग्राहक म्हणून एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना कायद्याने अधिकार दिले आहेत. ‘जागो ग्राहक’ या योजनेद्वारे या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे प्रत्येकाला बंधनकारक आहे. सिटी न्यूज परिवार तर्फे आज जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आमच्या असंख्य वाचकांना आम्ही आज ग्राहकांचे मूलभूत हक्क  कोणती याची माहिती घेऊन आलो आहोत.

ग्राहकांचे मूलभूत हक्क

माहितीचा हक्क 

एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व इत्यंभूत माहिती मिळवणे हा ग्राहकांचा हक्क आहे. संबंधित उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही. किंबहूना सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार आहे.

निवडीचा हक्क

वस्तूंची खरेदी करताना आपल्याला हवी असलेलीच वस्तू निवडून घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. कारण आज अटीतटीच्या स्पर्धेच्या युगात ग्राहकाला एकाच वस्तूचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्याच्या निवडीलाही स्वातंत्र्य आहेच, पण एखाद्या विक्रेत्याने संबंधित ब्रँड्सच्याच वस्तू खरेदीचा दबाव टाकल्यास हे ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या हाॅटेलात गेलात. तिथे तुम्ही कोल्ड ड्रींकची आॅर्डर केली. वेटरने तुम्हाला सांगितलं की एकाच प्रकारचे कोल्ड ड्रींक येथे मिळेल तर हे ग्राहकांच्या हक्काविरोधात आहे, कारण अनेक पर्यायातून एक पर्याय निवडीचा अधिकार ग्राहकांना आहे.

सुरक्षितेचा हक्क  

ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेची हमी उत्पादकांनी घेणे बंधनकारक आहे. वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसेच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अॅगमार्कचं चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात.

मत मांडण्याचा हक्क

एखाद्या ठिकाणी तुमची फसवणूक झाली असे वाटत असेल तर त्यासंदर्भात तक्रार निवारण मंच आणि ग्राहक हक्क न्यायालयात दाद मागण्याचा हक्क सरकारने ग्राहकांना दिला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतो.

ग्राहक शिक्षण अधिकार

ग्राहकांचे हक्क जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. त्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर शिबीरे अथवा कार्यशाळा राबवत असते.

ऑनलाईन तक्रार निवारणासाठीचे अधिकार

आजकाल आॅनलाईनच्या ई काॅमर्सच्या व्यासपीठातूनही ग्राहक आणि विक्रेता यांच्यात कोट्यवधींचे व्यवहार केले जातात. राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकावर (एनसीएच) वर ग्राहकांनी नोंदवलेल्या ई-कॉमर्स बाबत तक्रारींच्या संख्येतही वाढ झाली आहे. यासाठी, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकावर तक्रारींच्या नोंदीबरोबरच परतावा, बदली आणि सेवेतील कमतरता यासारख्या ग्राहकांच्या सामान्य तक्रारींचे जलद निराकरणही होते, याची खात्री करण्यासाठी, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकाला तांत्रिकदृष्ट्या मजबूत केले जात आहे.


राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक, खटला दाखल करण्या पूर्वीच्या स्तरावर पर्यायी विवाद निवारण यंत्रणा म्हणून काम करते, ज्यामध्ये ग्राहक ‘१९१५’ वर कॉल करून किंवा मोबाइल अॅपद्वारे सहजपणे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक, याच्याशी अलीकडेच जोडण्यात आलेल्या मैथिली, काश्मिरी आणि संथाली या भाषांसह देशातील एकूण १७ भाषांमध्ये सेवा देतो. त्याशिवाय ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी, ई-दाखिल पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे.


जागतिक ग्राहक हक्क दिवसाचा इतिहास 

जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांच्याकडून घेतली गेली. त्यांनी १५ मार्च १९६२ रोजी युएस कॉंगेसला एक विशेष संदेश पाठवण्यात आला.. यामध्ये त्यांनी ग्राहकांच्या हक्कांचे मुद्दे ठळकपणे मांडले. असे करणारे ते पहिले जागतिक नेते होते. त्यानंतर ग्राहक चळवळीने १९८३ मधली तारीख ठरवली. त्यानंतर १५ मार्चपासून ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या महत्वाच्या समस्यांवर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top