प्रतिनिधी खय्युम शेख
कोजागिरी आणि मंदिर पौर्णिमा यानिमित्त तुळजापूरकडे पायी चालत जाणाऱ्या भाविकांची गर्दी होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा व 29 ऑक्टोबर 2023 रोजी मंदिर पोर्णिमा यादरम्यान वाहन चालकांसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रासह, कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूरकडे पायी चालत जात असल्याने वाहतुकीची कोंडी होवू नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी भाविक पायी चालत जाणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहेत. भाविकांचे सुरक्षिततेच्या कारणावरुन खालीलप्रमाणे वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. 26 ऑक्टोबर 2023 रोजीपासून 29 ऑक्टोबर 2023 रोजीचे 24 वा. दरम्यान खालील मार्गावरून पथक्रमण करण्यास अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात येत आहे.
पथक्रमण करण्यास मनाई करण्यात आलेले मार्ग
- तुळजापूर ते सोलापूरकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे.
- छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद कडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीस पथक्रम करण्यास धाराशिव-तुळजापूर- नळदुर्ग पर्यंत मनाई करण्यात आली आहे.
- तुळजापूर ते बार्शीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास तुळजापूर-ढेकरी- गौडगाव- बार्शी या दरम्यान मनाई करण्यात आली आहे.
- लातूर ते सोलापूर येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीस पतक्रम करण्यास औसा तुळजापूर तामलवाडी सोलापूर यादरम्यान मनाई करण्यात आली आहे
या मार्गावरील वाहने खालीलप्रमाणे मार्गक्रमण करतील
- तुळजापूर ते सोलापूरकडे येणारी व जाणारी वाहतुक मंगरुळपाटी इटकळ , बोरामणी मार्ग पथक्रमण करतील.
- छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद येणारी व जाणारी वाहतूक छत्रपती संभाजी नगर बीड माजरसुंबा अंबाजोगाई लातूर औसा उमरगा मार्ग पथक्रम करतील
- तुळजापूर ते बार्शीकडे येणारी व जाणारी वाहतुक तुळजापूर, धाराशिव, वैराग, बार्शी मार्ग पथक्रमण करतील.
अत्यावश्यक वाहनांना बंदी नाही
पोलीस, रुग्ण सेवा, अग्निशमन दलाचे वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच एस. टी. बसेस या वाहनांना ही बंधने लागू राहणार नाहीत. 26 ऑक्टोबर 2023 रोजीपासून 29 ऑक्टोबर 2023 रोजीचे 24 वा. दरम्यान तुळजापूर घाट हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद असणार आहे, याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षय कार्यालय धाराशिव यांच्या वतीने काढण्यात आले आहे.