विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ७५ वर्षांनंतर हगलूर तांड्यावर लालपरीचे आगमन

mhcitynews
0

विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान; लालपरीच्या आगमनाने आनंदोत्सव

नळदुर्ग प्रतिनिधी 

तुळजापूर तालुक्यातील हगलूर तांडा वस्तीला तब्बल ७५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) 'लालपरी' बससेवा सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विभाग नियंत्रक अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मथुरा जाधवर, आगार प्रमुख महेश रामपुरे, पाचंगे, सुधीर बामणकर आणि महेश डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्गचे वाहतूक नियंत्रक अनिल हांडे व मुकुंद वैद्य यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधल्याने अखेर हगलूर तांड्यावर एसटी बससेवा सुरू होऊ शकली नवीन बससेवेच्या शुभारंभानिमित्त बसची विधिवत पूजा नळदुर्गच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका सुमनताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सागर हजारे, बलदेव ठाकूर, जमन ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बससेवेची जबाबदारी चालक एन. आर. रोडे आणि वाहक ए. व्ही. मुगळे हे सांभाळणार असून त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांना नियमित, सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या नव्या बससेवेचा सर्वाधिक लाभ हगलूर तांड्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे. माया संतोष दराडे, अपेक्षा छत्रभुज घुगे, धीरज तानाजी घुगे, राजनंदिनी घुगे,यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना आता शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला असून पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top