राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर समारोप - प्र.प्राचार्य डोके
तुळजापूर प्रतिनिधी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने 'युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास' हे विशेष श्रम संस्कार शिबिर दि.१४ ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मौजे कामठा, ता. तुळजापूर जि.धाराशिव येथे संपन्न झाले. सदर शिबिराच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य मेजर डॉ. प्रोफेसर यशवंतराव डोके यांनी वरील प्रतिपादन केले.
ग्रामीण जीवनातील व शहरी जीवनातील जीवन शैली यांमध्ये खूप फरक आहे. मोबाईलच्या काळात श्रम शक्तीचा ऱ्हास होत चालला आहे. ज्या अर्थाने श्रमदानाचे महत्त्व कमी होत जाईल त्या अर्थी सामाजिक मूल्ये ढासळतील. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी काळाचे महत्त्व ओळखून ही मूल्ये जोपासली. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना हीच शिकवण दिली. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा संदेश दिला तो यासाठी की देशातील सामाजिक मूल्ये जिथे सर्व प्रथम रुजली गेली तो ग्रामीण भागच आहे. शेतकरी ग्रामीण भागात शेतीची मशागत करत करत मूल्यांची मशागत करत असतो ही गोष्टींची जाणीव शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना होती. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या मूल्यांची जोपासना होते म्हणून तरुणांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या गोष्टी आत्मसात करणे काळाची गरज आहे असे अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. या वेळी प्रमुख उपस्थित म्हणून पोलिस पाटील चंद्रभागा जमदाडे यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी प्रशांत रोकडे, उपसरपंच कामठा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. व्ही. एच. चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. बी. जे. कुकडे यांनी केले तर आभार प्रा. एस. पी. वागतकर यांनी केले. सदर प्रसंगी डॉ. मंत्री आर. आडे, डॉ. रोकडे,प्रा.सुदर्शन गुरव, डॉ .सी.आर.दापके, डॉ.एफ.एम.तांबोळी ,प्रा.अमोल भोयटे, डॉ. दयानंद हाके यांचे सहकार्य लाभले. या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
