प्र प्राचार्य डॉ डोके सेवा गौरव समारंभ संपन्न
तुळजापूर प्रतिनिधी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथील प्रभारी प्राचार्य डॉ यशवंतराव डोके हे तब्बल ३७ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी वरील प्रतिपादन केले.शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे, स्वामी विवेकानंद आणि अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम प्रारंभी संपन्न झाला. आणि संस्थेच्या प्रार्थनेने सेवा गौरव कार्यक्रमाचा प्रारंभ झाला
यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना कौस्तुभ गावडे पुढे म्हणाले की,शिक्षक हे गुणवान असतात,पण शिक्षकांच्या विचारसरणीचा पाया हा संस्कारक्षम असणे आवश्यक आहे,कारण आपण कितीही आधुनिक झालो तरी मानवतेचे शिक्षण हे संस्कारक्षम शिक्षकच देऊ शकतात,घरात आज्जी आजोबा असतात,आई वडील असतात हे सर्व जण अनुभवांचे विद्यापीठे असतात, माणूस शिक्षणाने फक्त मोठा होतो पण संस्कारात शिक्षित झालेला व्यक्ती हा समाजात देखील संस्कारांची बिजे पेरत असतो.प्र प्राचार्य डॉ डोके यांची कारकीर्द ही प्राध्यापक म्हणून खुप यशस्वी ठरली , अनेक विद्यार्थी त्यांच्या शिस्तिमुळे घडले त्यांचे हे कार्य सदोदित लक्षात रहाणारे असेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा प्राचार्य रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव डॉ जयसिंगराव देशमुख म्हणाले की,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये जे शिक्षण मिळते ते फक्त पुस्तकांचे नव्हे तर माणूस घडविण्याचे देखील शिक्षण येथे प्राप्त होते.आज समाजाला माणसांपेक्षा मानवता गरजेची आहे, विद्यार्थी शिक्षण घेऊन ज्यावेळी महाविद्यालय सोडून बाहेर पडतो त्यावेळी खऱ्या अर्थाने तो एक सामाजिक नागरिक म्हणून समाजात सहभागी होत असतो ,समाज मुळात वाईट कधीच नसतो ,कोळशात हात घातला तर हात काळे होतात म्हणून आपण कोळशापासून दूर रहातो.पण शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी याच कोळशातुन संस्कारक्षम विद्यार्थीरुपी हिरे बाहेर काढले आहेत हे त्यांचे कार्य आपणांस विसरता येणार नाही.
सदर प्रसंगी सत्कारमूर्ती डॉ यशवंतराव डोके म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या विचारांवर आयुष्यभर कार्य करण्याचा प्रयत्न केला,ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार हे ब्रिद कायम मनाशी बाळगून शैक्षणिक कार्य केले,या अभिमंत्रित घोषवाक्याने जगण्याचे बळ मिळाले कोणत्याही परिस्थितीत न डगमगता काम केले, सुरुवातीला तुळजापूर मध्ये काम करणे सोपे नव्हते पण एन सी.सी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्तिचे धडे देता आले आणि शेवटी समाधान घेऊन सेवाभावी वृत्तीने सेवानिवृत्त होत आहे असे अनमोल विचार त्यांनी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य अशोक मगर, आप्पासाहेब पाटील, महेंद्र कावरे , डॉ आनंद मुळे, डॉ.सुयोग अमृतराव, डॉ.सागर डोके यांच्या सह इतर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ.सी आर दापके यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा धनंजय लोंढे,प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर,प्रा गोकुळ बाविस्कर यांचे उत्तम सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले तर आभार प्रा डॉ.मंत्री आर आडे यांनी मानले.सदर प्रसंगी डॉ डोके यांच्या कारकिर्दीतील माजी विद्यार्थी तसेच आजी विद्यार्थी, नातेवाईक, तसेच विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कृष्णमूर्ती, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे डॉ.संदीप देशमुख, डॉ.मच्छिंद्र नागरे यांच्या सह शहरातील सर्व नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

