तुळजापूर प्रतिनिधी
मृत्यू हा अटळ आहे आणि तोच एक सत्य आहे. मरते वेळेस भगवंताचं स्मरण झालं पाहिजे आणि त्यासाठी आयुष्यभर मानवाने नामस्मरणाचा सराव केला पाहिजे तरच मृत्यूच्या वेळेस भगवंताचे स्मरण होणे शक्य आहे. मृत्यूवेळेस आपण जे काही आठवल त्यानेच पुढील जन्म मिळतो. जसे की नामस्मरण आठवले तर मृत्युनंतर वैकुंठात प्रवेश मिळतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी , सतत नामस्मरण केल म्हणून त्यांना नेण्यासाठी वैकुंठातून विमान आले. असे प्रतिपादन श्रीमान श्रवण भक्ती प्रभुजी यांनी केले. शारदा मंगल कार्यालय येथील श्रीमद भागवत कथेच्या चौथ्या दिवशीच्या सेवेत ते बोलत होते.
महाराजांनी ध्रुव महाराजांची कथा सांगितली. ध्रुव महाराजांच्या आईने फक्त पाच वर्षाच्या ध्रुव महाराजांना भगवंत प्राप्तीसाठी प्रोत्साहन दिले. ध्रुव महाराजांनी परमेश्वर प्राप्तीचा ध्यास घेतला. धृव महाराजांना केवळ पाच वर्षे वयात आणि केवळ सहा महिने तप करून भगवंत प्राप्ती झाली. सद्य स्थितीत प्रत्येक आई वडिलांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांना कृष्ण भावना भावित बनविले पाहिजे. त्यांना हरिनाम घ्यायला शिकविले पाहिजे. प्रत्येकाच्या घरात गीता, ज्ञानेश्वरी, गाथा,भागवत हे पवित्र ग्रंथ असलेच पाहिजेत.
मुलांना आपल्या पवित्र ग्रथांचा आश्रय घ्यायला , वाचयला शिकविले पाहिजे तर आणि तरच आपला हिंदू धर्म टिकेल व भावी उत्तम पिढी घडेल. आज चौथ्या दिवशीच्या सेवेत पाचशे भाविक भक्त हजर होते. कथेनंतर हरिनाम संकिर्तन, आरती होऊन सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
