सामाजिक कार्यकर्ते विशाल रोचकरी यांनी केली होती तक्रार
तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर येथील नगरपरिषदेच्या मालकीच्या भूखंडावर लातूर येथील सुनील फर्म इंजिनियर कंपनीने करारातील अटी व शर्तीचा भंग करून नगरपालिकेची आर्थिक फसवणूक केल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विशाल विजय रोचकरी यांनी केलेल्या तक्रारीवरून नगरपरिषदेने लातूर येथील या कंपनीस नोटीस दिली असून सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपले म्हणणे मांडण्यास उपस्थित राहण्याची नोटीसद्वारे कळवण्यात आले आहे. अन्यथा कंपनी विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल असे नोटसीद्वारे म्हटले आहे.
शहरातील मोक्याच्या ठिकाणी बसस्थानका जवळ असलेल्या नगरपरिषदेच्या मालकीच्या भूखंडावर लातूर येथील सुनील फार्म इंजिनिअर कंपनीच्या वतीने सुनील प्लाझा ही व्यापारी गाळे असलेले इमारत कराराद्वारे उभारण्यात आली. परंतु बनावट कागदपत्रा आधारे व नगररचनाकार यांनी मंजूर केलेल्या रेखा नकाशा नुसार बांधकाम न करता तसेच करारनाम्यातील अटी व शर्तीचा भंग करण्यात आल्याचे कंपनीवर आरोप करण्यात आले. याविषयी तुळजापूर पोलीस स्टेशनसह वरिष्ठ प्रशासनाकडे या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली तसेच याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा (रजिस्टर नंबर ३०४/२०१८) दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात आरोपी असताना देखील कंपनीने गाळेधारकांकडून अद्याप पावेतो 'भाडे स्वरूपात दरमहा पैसे वसूल करत असल्याची तक्रार रोचकरी यांनी केली. त्यामुळे नगरपालिकेची आणखी फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होत आहे. तरी यात गुंतलेल्या संबंधितावर आर्थिक अपहार संबंधी लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई करण्यासंबंधी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांनी सूचित करावे असे कळविले तसेच तुळजापूर नगरपरिषद मालकी भूखंडावर या कंपनीने करारनाम्यातील अटी व शर्थीनचा भंग केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत नगरपरिषदेने सदर कंपनी विरोधात नोटीस बजावली आहे.
