हदगाव प्रतिनिधी
सगळेच राजकीय पक्ष टोकाची व जातीयवादी भूमिका घेत आहेत आणि महाराष्ट्राचा विचार धरून समाजकारण कुणालाही करायचे नाही. अश्यावेळी या राज्यासाठी आणि इथल्या रयतेसाठी प्रामाणिकपणे काम करणारा पक्ष म्हणून स्वराज्य पक्ष मी उभा केलेला आहे याचा मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
हदगाव-हिमायतनगर येथील स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधव देवसरकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे स्टार प्रचारक दिपक केदार, महादेव तळेकर, शिवाजी सवटकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेले की कधीही काँग्रेससोबत जाणार नाही, मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर हात मिळवले, हे सारं कशासाठी? सत्तेसाठीच ना असा बोचरा प्रश्न राजेंनी विचारला. राजकारणाची पातळी दिवसेंदिवस घसरत असताना गद्दारी करणं हा सर्वमान्य मार्ग झालाय अशी खंत राजेंनी बोलून दाखवली.
स्थानिक परिस्थितीबद्दल बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की हदगाव परिसराचा विकास का नाही झालेला? या नांदेड जिल्ह्याने इतके मुख्यमंत्री राज्याला दिले, पण तरीही मूलभूत सुविधांपासून हा भाग आजही मागासलेला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही, कारण अडते आणि व्यापारी हे प्रस्थापितांचे ठरलेले! मग शेतकरी दोन पैसे कमावणारी कसा? आपल्यासारख्या विस्थापितांनी राजकारण करावे की नाही आणि भागाचा विकास व्हावा कसा?
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, स्वराज्य पक्षाने जे जे उमेदवार दिलेत ते सगळे विस्थापित समाजघटकांपैकी आहेत आणि तेच उमेदवार निवडून येऊन या भागाचा विकास करतील व शिव-शाहू-फुले-आंबेडकरांना अभिप्रेत महाराष्ट्र आकाराला आणतील हा आमचा विश्वास आहे. आणि याचसाठी सप्तरंगासह नीब या चिन्हावर शिक्का मारून स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणून नवीन स्वराज्याची आपण सुरुवात करूया असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
घराणेशाही संपवण्याच्या लढाईत साथ द्या - देवसरकर
या सभेत बोलताना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधव देवसरकर म्हणाले की, वीस वर्षांत जो त्रास झाला नाही, तो या पंधरा दिवसात झाला. आजच्या सभेसाठी संभाजीराजे छत्रपती यांचे हेलिकॉप्टर उतरू नये, म्हणून विद्यमान आमदारने दबाव आणला. माझे वडील गेलेत, मी दुःखात आहे, माझे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. घराणेशाही विरुद्ध ही लढाई आहे, शेतकरी पुत्राची ही लढाई आहे. आपला मतदार संघ हा 25 वर्ष मागे आहे. तालुक्यात एमआयडीसी नाही, रोजगार नाही. तेव्हा आता घराणेशाही संपवण्याच्या लढाईत साथ द्या. मी तालुक्याच चित्र बदलून दाखवतो.
