सिटी न्यूज वार्ता
राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हटली जाणार्या एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. उद्या 25 जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठी कात्री लागणार आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाची 276 वी बैठक परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, राज्य परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकील राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) आणि परिवहन आयुक्तदेखील उपस्थित होते. या बैठकीत एसटीला 14.95 टक्के भाडेवाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे.
डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किमती वाढल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे आपोआप भाडेवाढ सूत्रानुसार उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास राज्य परिवहन प्राधिकरणाच्या 276 व्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. हकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये 14.95 टक्के वाढ करण्यास मान्यता मिळाली आहे. ही भाडेवाढ दि. 25 जानेवारीपासून लागू करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.
