आधीच वैद्यकीय सुविधांची वानवा – तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील मंजूर सिटी स्कॅन मशीन लोणावळा येथे हलविण्याचा निर्णय

mhcitynews
0

 


तुळजापूर / सिद्दीक पटेल 

शहरातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेली मर्यादित वैद्यकीय साधने व सुविधा यामुळे रुग्णांना आधीच मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता या रुग्णालयातील अत्यावश्यक मंजूर सिटी स्कॅन मशीन लोणावळा येथे हलविण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

तुळजापूरसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सिटी स्कॅन ही महत्त्वाची वैद्यकीय सेवा आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात जावे लागल्यास वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र, शासनाने अचानकपणे ही मशीन इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक रुग्णांसाठी ही मोठी अडचण निर्माण होणार आहे.


रुग्णांचे होणार हाल

तुळजापूर व परिसरातील अपघातग्रस्त रुग्ण, मेंदू विकार, हृदयविकार किंवा तत्सम आजार असलेल्या रुग्णांना तातडीने सिटी स्कॅन आवश्यक असते. मशीन उपलब्ध नसल्याने त्यांना धाराशिव किंवा सोलापूर येथे जाण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे रुग्णांचे हाल वाढणार आहेत.


नागरिक व डॉक्टरांकडून तीव्र नाराजी

शहरातील नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. "आमच्या भागातील आरोग्यसेवा आधीच अपुरी आहे. मशीन हलविल्यास रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागेल," अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा

ग्रामीण व निमशहरी भागातील आरोग्यसेवा आधीच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत सिटी स्कॅनसारख्या मूलभूत वैद्यकीय सुविधांचे स्थलांतर करण्याऐवजी, त्या ठिकाणी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


शासनाने निर्णय मागे घ्यावा – महाविकास आघाडीची मागणी

स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या उपरही हा निर्णय रद्द नाही झाल्यास आम्ही तुळजापूरकर व तुळजापूर तालुक्यातील महाविकास आघाडी आपल्या पद्धतीने समाचार घेऊत. वेळ प्रसंग या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा महाविकास आघाडीच्या व घटक पक्षाकडून देण्यात आले.


आता या निर्णयावर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top