तुळजापूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जय भवानी तरुण मंडळ व जाणता राजा युवा मंच मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने दि.१८ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध भव्य आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८:०० वाजता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला अभिषेक करून सोहळ्यास शुभारंभ करण्यात आला.
त्यानंतर ११:०० वाजता मंडळाचे ज्येष्ठ सभासद यांच्या हस्ते ध्वजारोहण करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी श्रीराम ढोल पथकाने वाद्यांच्या निनादात छत्रपतींच्या मूर्तीस मानवंदना दिली.
सायंकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीस सप्त नद्यांच्या जलाने आणि १०८ सुवर्ण होनांनी अभिषेक करण्यात आला. यानंतर १००८ किलो फुलांनी भव्य पुष्पवृष्टी करून शिवरायांना वंदन करण्यात आले.
यावेळी नरवीर तानाजी मालुसरे आणि सरनोबत येसाजी कंक यांचे वंशज रायबा मालुसरे व सिद्धार्थ कंक, तसेच माजी मंत्री श्री. मधुकररावजी चव्हाण (साहेब) यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
संध्याकाळी ८:०० वाजता सुप्रसिद्ध शिवशाहीर सुरेशजी जाधव (छत्रपती संभाजीनगर) यांनी अंगावर शहारे आणणारा जोशपूर्ण पोवाडा सादर केला. त्यांच्या ओजस्वी वाणीने संपूर्ण शिवप्रेमी जनता भारावून गेली.
या भव्य सोहळ्याला धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक मा. श्री. विवेक देशमुख आणि तुळजापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.

