तुळजापूर / प्रा. चव्हाण
“आधुनिक यांत्रिकीकरणामुळे आणि आभासी विश्वाच्या वाढत्या प्रभावामुळे माणूस एकलकोंडी झाला आहे. मात्र, भाषा आणि साहित्याच्या माध्यमातून संवेदनशीलता जपली गेली पाहिजे,” असे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देविदास सौदागर यांनी व्यक्त केले.
तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर सौदागर लिखित उसवण कादंबरीवर आधारित ‘तुतारी’ भित्तिपत्रिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना देविदास सौदागर म्हणाले, “मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगू नये. नव्या पिढीने अधिकाधिक वाचन आणि लेखन करून अभिव्यक्ती विकसित करावी. भाषा समृद्ध होण्यासाठी शब्दसाठा वाढवणे महत्त्वाचे आहे, यासाठी दर महिन्याला किमान एक पुस्तक वाचले पाहिजे.”
प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “इंग्रजी भाषेचे प्रभाव वाढत असले तरी मराठीला धोका नाही. मात्र, आपली मातृभाषा टिकवण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी तरुणांनी लेखन व सामाजिक विषयांवर अभिव्यक्ती करणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. बापूराव पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वनिता बाबर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. अनंता कस्तुरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
