भ्रष्टाचारविरोधी लढ्याला गुंडांची धमकी – "तुम्हालाच नाही, कुटुंबालाही बघून घेऊ!"

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

"भ्रष्टाचाराविरोधात लढल्यास परिणाम भोगावे लागतील!" – असा थेट इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आला आहे. हे धमकीचे प्रकार गावगुंडांच्या माध्यमातून होत असले तरी, त्यामागे भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षकांकडे जीवितास धोका असल्याचे निवेदन देऊन पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.


भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाटील यांचे आंदोलन खुपले?

गणेश पाटील यांनी भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेत, मंदिर संस्थानातील बोगस पास घोटाळा, भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांची गैरहजेरी, आरोग्य विभागातील बोगस डॉक्टर रॅकेट, तसेच अवैध वीटभट्ट्यांविरोधात सातत्याने आंदोलन केले आहे.


25 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, तुळजापूर येथे त्यांनी अवैध वीटभट्ट्यांवर कारवाईसाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी केला. मात्र, त्यानंतर तहसील कार्यालयाबाहेर एका अज्ञात व्यक्तीने पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना थेट धमकी दिली –

 आंदोलन करता? आता बघून घेतो!"


गुन्हेगारांना पाठबळ देणारा अधिकारी कोण?

यापूर्वीही पाटील यांना फोनवरून धमक्या देण्यात आल्या होत्या. या सर्व धमक्यांमागे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे समर्थन असून, त्यांच्या सांगण्यावरूनच गावगुंडांकडून दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. "जनतेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असतील, तर प्रशासनात बसलेले भ्रष्ट अधिकारी हे या गुन्हेगारांचे संरक्षणकर्ते आहेत का?" असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


पोलिस प्रशासन काय कारवाई करणार? संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!


लोकशाही मार्गाने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने दबाव आणला जात असेल, तर प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. आता पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासन गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.


"भ्रष्टाचाराविरोधातील आवाज दडपण्यासाठी जर गुंडांचा वापर होत असेल, तर हा केवळ एक कार्यकर्त्याचा नव्हे, तर संपूर्ण न्याय व्यवस्थेचा पराभव असेल!" – असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.


या संपूर्ण प्रकरणावर पोलिस प्रशासन आणि जिल्हा अधिकाऱ्यांची काय भूमिका असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top