तुळजापूर प्रतिनिधी / सिद्दीक पटेल
शहरातील वाढती गुन्हेगारी, खुलेआम सुरू असलेले दोन नंबर धंदे आणि नुकतेच उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणामुळे तुळजापूर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करत पोलीस प्रशासनाला ७२ तासांची मुदत दिली होती. मात्र, मुदत संपण्याआधीच तुळजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची अचानक धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
या नाट्यमय घडामोडींमुळे शहरात चर्चांना उधाण आले असून, ही कारवाई कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी झाली की, राजकीय दबावामुळे, यावर उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. खांडेकर यांच्या जागी आनंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, तुळजापूरच्या कायदा-सुव्यवस्थेचा कारभार आता त्यांच्या हाती असेल.
शहरातील संताप आणि नागरिकांची मागणी
गेल्या काही महिन्यांपासून शहरात सर्रास सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलीस दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक आणि पुजार्यांनी वारंवार केली होती. विशेषतः, पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईहून आलेले ड्रग्ज पकडले गेल्याच्या घटनेने या असंतोषाला अधिक धार आली. पोलीस प्रशासन गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप होत असतानाच, ही तडकाफडकी बदली करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवीन निरीक्षकांसमोर मोठे आव्हान
आता नव्याने नियुक्त करण्यात आलेले पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. वाढत्या चोरीच्या घटना, अवैध धंदे आणि ड्रग्ज रॅकेट्सवर कडक कारवाई करणे, तसेच शहरातील कायदा-सुव्यवस्था सुधारणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असेल. नागरिक आता त्यांच्या निर्णयांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ही केवळ बदली की मोठ्या कारवाईची सुरुवात?
पोलीस निरीक्षकांच्या बदलीमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाहीत. मात्र, यामुळे पुढील काही दिवसांत आणखी काही मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुळजापूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी आता प्रशासन काय ठोस पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
तुळजापूरच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी ही बदली निर्णायक ठरणार का ? की केवळ एक राजकीय डाव, यावर शहरवासीयांचे लक्ष लागून आहे!
