तुळजापूर प्रतिनिधी
समस्त कासार समाजाचे कुलदैवत श्री कालिका देवीचा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. रविवार, २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या सोहळ्यासाठी धाराशिव, पुणे, लातूर, सोलापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आदी भागांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता धार्मिक विधींनी झाली. देवीची महापूजा, अभिषेक, यज्ञ आणि श्री दुर्गासप्तशती पठण यांसारख्या विधींनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालला. श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य महंत श्री वाकोजीबुवा यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. पूजेचे पौराहित्य श्री सर्वोत्तम जेवळीकर यांनी केले, तर पूजेचे यजमान सौ. व श्री. सुवर्णा बाळकृष्ण कोकीळ होते.
यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे महाप्रसाद, ज्याचे आयोजन सौ. व श्री. विनानंदकुमार निडारकर यांनी केले होते. जवळपास १८०० ते २००० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण पूजेची व्यवस्थापन जबाबदारी श्री नितीन जंगमे यांनी समर्थपणे पार पाडली.
महोत्सवासाठी भाविकांच्या येण्या-जाण्याच्या विशेष वाहन सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच श्री राजूशेठ झरकर यांनी देवीच्या सवोतीची आकर्षक सजावट करून धार्मिक वातावरण अधिक मंगलमय केले.
विशेष म्हणजे, या महोत्सवात कासार समाज वधू-वर मेळावा आयोजित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. समस्त कासार समाजाने एकत्र येत हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला, ज्यामुळे समाजातील ऐक्य आणि धार्मिक भावना अधिक दृढ झाल्या.
