मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय भगवंतप्राप्ती - प्रजापती विष्णुदास

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय हे भगवंत प्राप्ती असून मनुष्य जन्मानेच हे शक्य आहे. सतत हरिनाम घेऊन आपण भगवंताला प्रसन्न करू शकतो. मनुष्याने दया केली,संतुष्ट राहिले ,इंद्रिय नियंत्रणात ठेवली तर भगवंत प्रसन्न होतात, असे मत प्रजापती विष्णुदास - इस्कॉन धाराशिव यांनी मांडले. जीवनात मनुष्याने नीतीने म्हणजे भगवंताला आवडेल असे वागावे. आपल्याला आवडेल तसे वागू नये. ध्रुवराजाने भगवंत प्राप्तीचे ध्येय मनात ठेवून नाम जप करून अवघ्या पाच महिन्यात भगवंत प्राप्ती करून घेतली, त्यानंतर त्याने 36 हजार वर्षे राज्य केले व अजरामर असे पद मिळवले. जीवनात आपण जसे कर्म करू त्याचे फळ तसे नक्की मिळणारच, हे कोणीही टाळू शकत नाही. 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर' हे अगदी त्रिकालाबाधित सत्य आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही. मरताना मनुष्य जो इच्छिल त्याला तो जन्म प्राप्त होतो. भरत महाराज हरणाचा ध्यास घेत मरण पावले तर त्यांना पुढील जन्म हरणाचा प्राप्त झाला.


कलियुगात 28 प्रकारचे नरक आहेत. आपण ज्याप्रमाणे पाप कराल त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फळ भोगावेच लागेल. संगतीचा मनुष्य जन्मावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. अजामेलाने नको ते दृश्य अवघे दोन सेकंद पाहिले तरी त्याची पूर्ण मती बदलली व तो नको तसे वागू लागला. त्याला दहा मुले झाली. शेवटचा मुलगा त्याचे नाव नारायण ठेवले. तो त्याचा लाडका मुलगा होता. तो सतत 'नारायण नारायण' असे म्हणत असे. मरताना देखील त्याने त्याच्या मुलाचे म्हणजेच नारायणाचे नाव घेतले, म्हणून त्याला मरताना विष्णू दूत वैकुंठात नेण्यासाठी आले .


कलियुगात हरिनाम न घेणारे, भगवंत चिंतन न करणारे, पांडुरंगाला नमन न करणारे असे लोक यमदूताला आवडतात. अंतिम वेळी यमदूत अशा लोकांना नेण्यासाठी येतात व त्यांना नरकप्राप्ती होते, असेही मत प्रजापती विष्णुदास यांनी मांडले.


भागवत कथेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी २५० ते ३०० लोक हजर होते. कथेनंतर आरती, संकीर्तन, महाप्रसाद झाला. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top