तुळजापूर / प्रा. चव्हाण सर
कलियुगात भगवंत प्राप्तीचे एकमेव साधन म्हणजे मनुष्यजन्म. मनुष्यजन्म अत्यंत दुर्मीळ असून ज्याला तो मिळाला ते खरोखरच भाग्यवान आहेत. कारण भगवंत प्राप्तीसाठी मनुष्यजन्म हे एकमेव साधन असून हरीनामानेच भगवंत प्राप्ती आहे, असे प्रतिपादन प्रजापती विष्णुदास - इस्कॉन धाराशीव यांनी केले. आहार, निद्रा, भय, मैथुन हे सर्व सजीवांमध्ये आढळतात ; परंतु सर्व सजीव हे भगवंत प्राप्ती करू शकत नाहीत. मनुष्यजन्मानेच - हरीनामानेच भगवंत प्राप्ती शक्य आहे. या भौतिक जगात मोहातून जो मुक्त झाला तोच भगवंताकडे येऊ शकतो. कलियुगात जो तो आपापल्या दुःखाने त्रस्त आहे. अशा त्रस्त जीवनात भगवंत कथा ऐकणे म्हणजे वाळवंटातील हिरवळ आहे, असे प्रभुजी म्हणाले. वृंदावनातील गोपी कृष्णासाठी रडतात, आपण संसारासाठी रडतो म्हणून गोपी सुख अनुभवतात, तर आपण दुःख अनुभवतो. असे प्रतिपादन प्रजापती विष्णुदास यांनी केले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जिजामाता नगर आयोजित श्रीमद् भागवत कथेच्या सहाव्या दिवशीच्या कथेत ते बोलत होते.
कृष्ण वृंदावन सोडून मथुरेला जाताना गोपींची अतिशय दयनीय अवस्था झाली. कित्येक गोपी मुर्च्छित होऊन पडल्या. ह्या प्रसंगाचे वर्णन ऐकताना श्रोत्यांचे अश्रू अनावर झाले. कृष्ण हे अष्टपैलू नेतृत्व असून ज्या रूपात आपण त्यांना पाहू त्या रूपात ते आपल्याला भेटतात, असे प्रभुजींनी सांगितले.
जया नाही नेम एकादशी व्रत । जाणावे ते प्रेत सर्वलोकी ॥ एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असून जे एकादशी करत नाहीत ते प्रेतवत आहेत, असे प्रभुजी म्हणाले.
शेवटी रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होऊन आरती, संकीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. आज ३००-३५० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.