तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिक शाळा या संस्थेत गंभीर स्वरूपाचा आर्थिक भ्रष्टाचार व विद्यार्थ्यांवरील मारहाणीचा प्रकार समोर येत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेने केला असून, यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळेमधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कोणतीही अधिकृत पावती न देता 35,000, 15,000, आणि 8,500 रुपये इतकी मोठी रक्कम अनधिकृतपणे वसूल करण्यात आली आहे. या बाबत तक्रारी करूनही संस्थेच्या वतीने कोणतीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे सदर शाळा ही श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या निधीतून चालवली जाते आणि शासनातून देखील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला जातो.
तसेच, आठवी इयत्तेतील एका विद्यार्थ्यावर शिक्षकाकडून मारहाण झाल्याचे प्रकरणही समोर आले असून, विद्यार्थी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पालकांनी यासंबंधी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शिवसेनेने या दोन्ही गंभीर प्रकारांची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी समितीद्वारे चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर तालुका प्रमुख अमोल जाधव यांच्या सह प्रशांत मस्के, रमेश कदम, भुजंग मुकेरकर, संजय पेंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
🔹 प्रमुख मुद्दे:
शाळेमध्ये अनधिकृत आर्थिक वसुली
विद्यार्थ्यांवर शिक्षकाकडून मारहाण
मंदिर संस्थानचा निधी असूनही पालकांकडून भरमसाठ पैसे उकळले जातात
दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा