भक्तनिवासाच्या जागेवर खासगी हॉस्पिटल? महाविकास आघाडीचा विरोध; आंदोलनाचा इशारा!

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

 श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत सन 2012 मध्ये भाविकांच्या निवासासाठी बांधलेले 124 भक्तनिवास सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या भक्तनिवासांचा उपयोग मूळ उद्देशाऐवजी खासगी हॉस्पिटल उभारण्यासाठी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने महाविकास आघाडी आणि स्थानिक भाविकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.


महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, रुग्णालयाची आवश्यकता नाकारली जात नाही, परंतु ते श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने धर्मादाय पद्धतीने मोफत चालवले जावे, अशी भाविकांची, स्थानिकांची आणि पुजाऱ्यांची इच्छा आहे. मात्र, काही राजकीय व्यक्तींनी स्वतःच्या स्वार्थासाठी मंदिर संस्थानवर दबाव टाकून खासगी संस्थेला हॉस्पिटल चालविण्याचा अधिकार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


या संदर्भात निविदा दोन वेळा जाहीर करण्यात आल्या आहेत, जे अत्यंत संशयास्पद असून, मंदिर संस्थानने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि खासगीकरणाचा घाट थांबवावा, अशी जोरदार मागणी महाविकास आघाडीने केली आहे.


भाविकांसाठी बांधलेले भक्तनिवास हे मूळ उद्देशानुसारच वापरण्यात यावेत, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात तात्काळ आदेश न दिल्यास महाविकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि गरज पडल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.


यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील, शिवेसेना नेते श्याम पवार, नागनाथ भांजे, राहुल खपले, सुधीर कदम, ऋषिकेश मगर, रामचंद्र ढवळे, विकास चव्हाण, गोरक्षनाथ पवार, रंजीत इंगळे, सुरेश कोकरे, उत्तम नाना अमृतराव, अमर चोपदार, संदीप कदम, किरण यादव, मधुकर शेळके सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top