"अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या; संपूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही – खा. राजेनिंबाळकर"

mhcitynews
0


धाराशिव प्रतिनिधी

माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे उपजीविकेचे साधनच हिरावून गेले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

या निवेदनाला कळंबचे आमदार कैलास पाटील व उमरगा-लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांचीही साथ लाभली. खासदारांनी सरकारकडे पुढील ठळक मागण्या केल्या आहेत –

तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील शेतकऱ्यांसाठी असलेल्या महत्त्वाच्या तरतुदी पुन्हा सुरू करून त्याचा लाभ द्यावा.

मिरज-कोल्हापूर प्रमाणेच अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यातही शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी.

रस्ते, पुल, बंधारे, तलाव व वीज वितरणाची पायाभूत सुविधा जी पुराने वाहून गेली आहे तिच्या विशेष दुरुस्ती कार्यक्रमाद्वारे तत्काळ पुनर्बांधणी करावी.

जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना, त्यात बहुभूधारक शेतकरीही समाविष्ट, न्याय्य भरपाई द्यावी.

पशुधन वाहून गेलेल्या शेतकरी व शेतमजुरांना बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी.

पडझड झालेल्या घरे व गोठ्यांसाठी तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.

पंजाब सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत महाराष्ट्र सरकारने तातडीने उपलब्ध करावी.


खा. राजेनिंबाळकर यांनी सांगितले की, “शेतकरी व मजूर वर्गावर आलेले संकट भयावह आहे. मायबाप सरकारने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने निर्णय घेतला नाही, तर या भागातील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होतील.”

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पुरस्थितीची दाहकता या निवेदनातून ठळकपणे मांडण्यात आली असून, आता राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top