तुळजापूर | सिद्दीक पटेल
तुळजापूर तालुक्यातील चिवरी पंचायत समिती गटात सध्या राजकीय वातावरण तापले असून, या गटातून प्रतिक (बप्पाराज) रोचकरी यांनी आगामी निवडणूक लढवावी, अशी ठाम व जोरदार मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यपद्धतीमुळे चिवरी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सक्षम व विश्वासार्ह नेतृत्व ठरतील, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले प्रतिक (बप्पाराज) रोचकरी यांनी चिवरी परिसरात कार्यकर्त्यांसह गाठीभेटी घेत थेट नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान अनेक ग्रामस्थ व स्थानिक कार्यकर्त्यांनी “चिवरी गटातूनच निवडणूक लढवा” अशी एकमुखी भूमिका मांडली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, काही वर्षांपासून बंद असलेली बससेवा सुरू करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या तत्पर व सकारात्मक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारे, जनतेत मिसळून काम करणारे आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असलेले नेतृत्व म्हणून प्रतिक (बप्पाराज) रोचकरी यांच्याबाबतचा नागरिकांचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचे चित्र चिवरी पंचायत समिती गटात दिसून येत आहे.
