अतिवृष्टीचा तडाखा; मात्रेवाडीतील शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या

mhcitynews
0


धाराशिव जिल्ह्यात मदतीची तातडीची गरज – शेतकरी प्रश्नांकित

धाराशिव प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच अतिवृष्टीचा गंभीर फटका भूम तालुक्यातील मात्रेवाडी (ता. भूम) येथील शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय 42) यांना बसला. पिकासह जमीनच नदीकाठावरून खरवडून गेल्याने प्रचंड ताणात असलेल्या पवार यांनी अखेर जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन जीवन संपवले असल्याचे बोलले जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पवार यांच्या शेतात कांदा व सोयाबीन पीक होते. मात्र अतिवृष्टीमुळे जमिनीसकट पीक वाहून गेले. त्यांच्यावर दोन ट्रॅक्टरचे कर्ज असल्याने या कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, हा प्रश्न त्यांना सतावत होता. तणावग्रस्त अवस्थेत त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे.


दरम्यान, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकरी हवालदिल झालेले आहेत. शेती उद्ध्वस्त झाल्याने “हे नुकसान भरून काढायचे कसे?” हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला छळत आहे.


आजच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच आपत्ती निवारण व जलसंधारण मंत्री धाराशिव जिल्ह्यात नुकसानीची पाहणीसाठी दाखल झाले असताना ही आत्महत्येची घटना घडली आहे.


शेतकऱ्यांचा रोष असा आहे की, पाहणीपुरते दौरे होतात; पण तत्काळ मदत व दिलासा मिळत नाही. सरकारने त्वरीत मदत जाहीर करून तणावग्रस्त शेतकऱ्यांना आधार दिला नाही, तर आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top