तुळजापूर प्रतिनिधी
शारदीय नवरात्र उत्सवातील सातव्या माळेच्या दिवशी रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा विधीवत पार पडली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
या विशेष दिवशी महाद्वार परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. पिवळ्या झेंडूच्या हजारो फुलांनी शेषनागाचे रूप साकारले गेले होते. त्यासोबत लाल गुलाब, जाई-जुई, रजनीगंधा व विविधरंगी आकर्षक फुलांनी संपूर्ण मंडप सुशोभित करण्यात आला होता. मध्यभागी देवीचा शेषशाही अलंकार आणि भोवती शेषनागाच्या फण्यांचे रुपडे दिसत असल्याने सजावटीला दिव्यता लाभली होती.
मुंबई येथील भक्त विकास भाऊ कदम (विठोबा माऊली इन्फ्राप्रोजेक्ट, नवी मुंबई) यांच्या वतीने ही देखणी सजावट उभारण्यात आली. रात्रीच्या प्रकाशझोतामध्ये फुलांच्या रंगसंगतीने नटलेली ही सजावट भाविकांना मंत्रमुग्ध करत होती. महाद्वारासमोर उभारलेल्या या शेषनाथ रुपी फुलांच्या अलंकरणाने भक्त भाविकांची पावले थबकली.
भाविकांनी सजावटीसोबत छायाचित्रे टिपून आपल्या श्रद्धेची नोंद करून ठेवली.
