अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवरांचा भाजपवर घणाघात

mhcitynews
0


प्रतिनिधी / सिद्दीक पटेल

"एखादं प्रकरण आपल्या अंगाशी आलं की त्यातून पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय आहे," असा जोरदार चिमटा शिवसेना जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढत भाजपवर निशाणा साधला आहे.


जाधवर म्हणाले की, "भाजपकडे सत्ता दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. त्यामुळे जर खरंच राणा पाटील यांना सत्य जनतेसमोर आणायचं असेल, तर त्यांनी स्वतःच एसआयटी चौकशीची मागणी करावी. त्यामुळे कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत हे स्पष्ट होईल."


भाजप प्रवक्त्यांमार्फत राणा पाटील जे बोलले ते सत्य शोधणे तुमच्यासाठी अवघड नाही, पण प्रश्न आहे इच्छाशक्तीचा, असा टोला त्यांनी लगावला. "वीस महिन्यांपासून तुम्हीच प्रकरणे प्रलंबित ठेवली, कामे अडवली — हे दाखवते की कोणता गुत्तेदार कोणाचा लाडका आहे. विषय भरकवटण्यासाठीच राणा पाटील जाणूनबुजून विषयांतर करत आहेत," असा आरोप जाधवर यांनी केला.


ते पुढे म्हणाले, "आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीच राणा पाटील यांनी यापूर्वीही जिल्हा नियोजन समितीची कामे थांबवली होती. आर्थिक लाभ नसेल, तर विकासकामात खोडा घालणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास थांबवणारा कोण, हे आता जनतेलाही चांगलं कळून आलं आहे."


जाधवर यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून, भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top