‘तुळजापूर कोणाच्या हाती ? - तुळजापूर नगरपरिषदेचा राजकीय आखाडा सज्ज

mhcitynews
0

 


महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने


तुळजापूर / सिद्दीक पटेल

तब्बल चार वर्षांच्या प्रशासनिक कारभारानंतर तुळजापूर नगरपरिषद पुन्हा एकदा निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभी आहे. ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे रखडलेल्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.


६ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षण सोडतीनुसार तुळजापूर नगराध्यक्ष पद सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी खुलं राहिलं आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येणार हे निश्चित आहे.


मागील कार्यकाळात नगरपरिषदेवर भाजपची सत्ता होती. यावेळी मात्र चित्र काहीसं वेगळं आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची शक्यता असून, या दोन्ही आघाड्यांतून संभाव्य उमेदवारांची चर्चाही जोरात सुरू झाली आहे.


महायुतीकडून विनोद (पिंटू) गंगणे व सचिन रोचकरी, तर महाविकास आघाडीकडून अमोल कुतवळ आणि ऋषिकेश मगर ही नावे आघाडीवर आहेत. या चार संभाव्य उमेदवारांभोवतीच सध्या राजकीय चर्चा सुरू असून, दोन्ही गट आपापल्या रणनीती आखण्यात व्यस्त आहेत.


दरम्यान, समाजवादी पक्षही या निवडणुकीत रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या वेळी तुळजापूर नगरपरिषदेची निवडणूक बहुकोनी आणि चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.


तुळजापूर नगरपरिषद ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर जिल्हा राजकारणातील नेतृत्वाची चाचणी मानली जाते. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राणा जगजीतसिंह यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असणार असून,  स्थानिक विकास, संघटनशक्ती आणि मतदारांवरील प्रभाव – या तिन्ही मुद्द्यांवर उमेदवारांची कसोटी लागणार असून असे राजकीय विश्लेषकांच्या वतीने मते व्यक्त केली जात आहे.


सोशल मीडियावरही निवडणूक चर्चेचा विषय ठरली असून, शहरात‘तुळजापूर कोणाच्या हाती?’ हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू झाला आहे. आगामी काही दिवसांत पक्षीय बैठका, उमेदवार निवड आणि प्रचार नियोजनाच्या हालचालींना गती येणार असून, तुळजापूरच्या नगरपरिषदेचा हा राजकीय आखाडा तापणार हे निश्चित आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top