तुळजापूर प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) धाराशिव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या वतीने आई जगदंबेच्या पावन भूमीत काढण्यात आलेल्या नगरसंकीर्तनास उदंड प्रतिसाद मिळाला. सकाळी 7:00 वाजता बस स्टॅन्ड येथून नगर संकीर्तनास प्रारंभ होऊन श्री माणिक कदम प्रभुजी कमान वेस येथे सांगता करण्यात आली. वाटेत ठिक-ठिकाणी प्रभुजींचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. कलियुगातील वाढता स्वैराचार, सामाजिक अराजकता तरुणांमधील निरुत्साह यासाठी हरिनाम हा एकमेव पर्याय असल्याचे यावेळी श्रीमान प्रजापती विष्णुदास - इस्कॉन धाराशिव यांनी सांगितले.
नगर संकीर्तनादरम्यान हरे कृष्ण भक्तांनी श्रील प्रभूपाद यांच्या पवित्र ग्रंथांचे वितरण केले. हरिनामामुळे मनाची एकाग्रता वाढून सतत हरिणाम घेतल्याने मन स्थिर राहण्यास मदत होते म्हणून सर्वांनी सतत भगवंताचे नामस्मरण केलेच पाहिजे असे प्रभूजींनी सांगितले. चौकाचौकात परगावाहून आलेले देवीभक्तही हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले होते. नगर संकीर्तनात सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
