तुळजापूर प्रतिनिधी
वृंदावन धाम येथील सुप्रसिद्ध कथाकार श्रीमान देवहरी प्रभूजी यांनी बीड येथील इस्कॉनचे अध्यक्ष श्रीमान विठ्ठलानंद प्रभूजी तसेच धाराशीव इस्कॉनचे कथाकार श्रीमान प्रजापती विष्णुदास प्रभूजी यांच्या समवेत इस्कॉनच्या संपूर्ण टीमसह तुळजापूरला सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर तुळजापूरमधील इस्कॉनच्या धार्मिक, आध्यात्मिक व जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा घेतला. भागवत कथा, प्रवचने, हरिनाम नगर संकीर्तन तसेच युवकांमध्ये अध्यात्माची जागृती घडविणाऱ्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
“तुळजापूरमध्ये इस्कॉनच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही अधिक व्यापक पातळीवर सेवा कार्य व्हावे,” असे मार्गदर्शन देवहरी प्रभूजी यांनी यावेळी केले.
या प्रसंगी श्रीमान सुहास साळुंके व श्रीमान महावीर कासार यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत केले. भेटीदरम्यान भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून उपस्थित भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.