तुळजापूर प्रतिनिधी
पवित्र अशा अधिक मासानिमित्त श्री रामचंद्र सोमाजी - कदम परिवार आयोजित श्रीमद् भागवत कथेच्या ग्रंथ दिंडीस भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला . रात्री 7 वाजता कथा स्थळापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला . पावणारा गणपती, साळुंके गल्ली, आर्य चौक, तुळजाभवानी मंदीर मार्गे कथा स्थळी सांगता करण्यात आली . दिंडी दरम्यान संपुर्ण परिसर ' हरे कृष्णाच्या ' महामंत्राने दुमदुमून गेला . दिंडीमध्ये अबाल - वृद्धांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला . महिन्यातील श्रीराम फेरी व ग्रंथ दिंडी एकत्र केल्याने भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. श्रीमद् भागवत कथेचा विश्राम दिवस असल्याने भाविकांची गर्दी लक्षणीय होती. कथेच्या शेवटी कथाकार, श्रीमान प्रजापती विष्णुदास प्रभूजी (इस्कॉन धाराशीव) यांनी भागवत ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीकृष्णच असल्याचे सांगितले. सर्वांवर दया करा, भगवंत ठेवतील त्या परिस्थितीत समाधानी रहा, इंद्रियांवर नियंत्रण ठेवा, जेवताना व बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवा यामुळे पुढील अनेक अनर्थ आपण टाळू शकतो असे प्रभुजींनी सांगितले.
ग्रंथदिंडीनंतर आरती होऊन सर्वांसाठी 'इस्कॉन खिचडी प्रसाद' चे वाटप करण्यात आले. यामध्ये 150 ते 200 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
