तुळजाई नगरीतील बालाघाट साहित्य संमेलनात बळीराजा केंद्रस्थानी
तुळजापूर प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित दुसरे बालाघाट मराठी साहित्य संमेलन आज तुळजापुरात उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन ,परिसंवाद ,कवी संमेलन असे विविध कार्यक्रम या संमेलनामध्ये संपन्न झाले .या संमेलनासाठी राज्यातून हजारो कवी .साहित्य व रसिक सहभागी झाले होते.उदघाटन प्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा शरद गोरे संमेलनाध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की साहित्यिक हा कुठल्या जातीचा वा धर्माचा नसतो ,साहित्यिकांनी मानवतेचं गाणं गायलं पाहिजे व साहित्याचा केंद्रबिंदू हा शेतकरी व सामान्य माणूस असला पाहिजे.
याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक इतिहास संशोधक प्रा. शरद गोरे हे अध्यक्षस्थानी होते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्राचार्य डॉ. अनिल शित्रे उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य योगेश केदार प्रमुख संयोजक ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर,तालुकाध्यक्ष अनिल आगलावे, जिल्हाध्यक्ष अशोक कुरुंद, माजी सभापती शिवाजीराव गायकवाड, राज्य संघटक अमोल कुंभार, सिने अभिनेते सुनील साबळे, गट शिक्षणाधिकारी मल्हारी माने, राष्ट्रीय विश्वस्त अनिल अनभुले, गुलचंद व्यवहारे यांच्यासह मोठया संख्येने साहित्यिक रसिक यावेळी उपस्थित होते.
या बालाघाट साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असणारे बोलीभाषेतील बदल आणि कृषी क्षेत्रामध्ये होणाऱ्या घटना घडामोडी शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू समजून करावयाचे लिखाण याला प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी उद्घाटक माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.सूत्रसंचालन भाग्यश्री देवकते यांनी केले व आभार प्रदर्शन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल शित्रे यांनी केले.
संमेलनात यांचा झाला सन्मान
कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच कर्तुत्वान व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मदन देगावकर यांना लोककवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार, पत्रकार डॉ. सतीश महामुनी यांना दिनकरराव जवळकर राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार, राजेंद्र गुंड यांना दिनकरराव जवळकर युवा राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार,शिवशंकर गवळी यांना बालाघाट कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

