' हे ' ठरल्या उस्मानाबादच्या होम मिनिस्टर !

mhcitynews
0


लेडीज क्लबच्या 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात महिलांनी लुटला मनमुराद आनंद

उस्मानाबाद प्रतिनिधी 

उस्मानाबादची होम मिनिस्टर कोण होणार ? ही उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत जाणारी होती. महिलांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लेडीज क्लब, उस्मानाबाद आयोजित हळदी-कुंकू आणि तिळगुळ वाटप कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

प्रति वर्षाप्रमाणे यंदाही मकरसंक्रांती निमित्त महिलांसाठी खास हळदी-कुंकवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम ठरला. सुप्रसिद्ध विनोदी कलाकार श्री.मंगेश फाकटकर यांनी वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून, तुफान विनोद सादर करत सलग ३ तास शहरातील महिलांचे मनोरंजन केले. संगीत खुर्ची, उखाणे, फुगे फोडणे, नृत्य, चेहऱ्याला टिकल्या लावणे, केसांमध्ये स्ट्रॉची रचना करणे अशा विविध खेळातून गमती-जमती घडत गेल्या. महिलांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

प्रत्येक राऊंड मधून ३ विजेत्यांची निवड करण्यात आली. शेवटच्या राऊंड मधील ५ विजेत्यांना पैठणी साडी घोषित करण्यात आली. होम मिनिस्टर स्पर्धेची शेवटची लढत अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये समतानगर येथील सौ.रंजना विकास टिपे या विजेत्या ठरल्या. तसेच सौ.सोनाली सचिन चांदणे या उपविजेत्या ठरल्या. दोघींचाही पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.

अंतिम राऊंड मधील ३, ४ व ५ व्या क्रमांकावरील स्पर्धकांना देखील पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली. तसेच उस्मानाबाद टॅलेंट सर्च राऊंड मधून कु.साक्षी फडणीस ही विजेती ठरली. तिला माहेरची साडी देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित असलेल्या महिलांच्या नावातून लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी करण्यात आली व नशीबवान ठरलेल्या महिलेस पैठणी साडी देण्यात आली. लेडीज क्लबच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सर्व पैठणी विजेत्यांनी व स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांनी आभार व्यक्त केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सचिन ओंबासे यांच्या पत्नी सौ.ओंबासे मॅडम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ.नंदाताई पुनगुडे, भाजपाच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ.मनीषाताई केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.उषाताई येरकळ, सौ.माधुरीताई गरड, सौ.विद्याताई माने, लेडीज क्लबचे पदाधिकारी व असंख्य महिलांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top